आज आठवणीने तुला फोन लावला
गेले चार दिवस का कोण जाणे
उगाच ठोका चुकायचा,
विचारांचा धागा कुठलेही टोक पकडून
तुझ्यापाशीच जुळायचा
तसे होतेच व्हॉटस ऍप वर
अधून मधून चॅट
आणि फेसबुक वर
हसऱ्या फोटोंची देवाण घेवाण
पण त्यातून भिडत नाहीत
श्वास रोखलेले स्वल्पविराम,
भावनेत भिजलेले अर्धविराम
अर्धेमुर्धे पूर्णविराम
स्पंदनांचे चढउतार
आणि
दोन शब्दांच्या अंतरात
लपलेला भावाविष्कार
भौगोलिक अंतर कापून
घडत नाही गळा मिठी
कितीही इमोजी टाकल्या तरीही.
म्हणून आज लावलाच फोन
गूजगोष्टी करण्यासाठी,
मनाची घागर रिकामी करून
भरून घेण्यासाठी
११/३०/२०
No comments:
Post a Comment