नेहेमीचीच आहे तुझी
यायची आणि जायची घाई
भेटीची नुसती चुटपुट
खरी भेट घडतच नाही
घड्याळाच्या काट्याला बांधलेले डोळे
फोनच्या स्क्रीनवर गुंतलेली बोटे
कामाचे बहाणे
वेळेचे गाऱ्हाणे
श्वासातले अंतर मोजताना
अर्थहीन संवाद चालू ठेवण्याची
धडपड
पोटातले ओठावर न येण्यासाठी
नेहेमीचीच आहे तुझी
यायची आणि जायची घाई
भेटीची नुसती चुटपुट
खरी भेट घडतच नाही
दोन्ही बाजूने तोच खेळ
टोलवाटोलवीत जातो वेळ
नाते असून परके
लाडके असून दोडके
घर व्यापून उरते
तुझे असून नसलेपण
अंतराची अभेद्य भिंत
अव्यक्त गुदरमरलेपण
एकदातरी भेटू
समज गैरसमजाच्या पलीकडे
अनोळखी झालेल्या खुणा,
धूसर झालेल्या आठवणी
परत एकदा गाऊ
विसरलेली गाणी
चेहेऱ्यावरचे मुखवटे
शब्दांची अस्त्रे
थोडी ठेवू कोपऱ्यात
मानापमानाची वस्त्रे
खात्री आहे मला की
परत सापडू एकमेकांना
आनंदाच्या झऱ्याकाठी,
मन उडेल होऊन
हलके फुलके
जीवा-शिवाची मिठी
No comments:
Post a Comment