|
|
यंदा बाप्पा परत एकदा
पृथ्वी प्रदक्षिणा खरी करा
दुष्ट माजले, अरिष्ट ठाकले
आतंक पसरे, रडे धरा
राक्षस मारा, असूर हारा
शस्त्र आता हाती धरा
मूषका वरून उतारा आता
सत्वर वेगे उड्डाण करा
किती करावी आर्जवे, याचना
किती अर्पावे मोदक ही
कितीदा धरावे पाय विनवूनी
उठा उठा हो गणराया
सुकाळ झाला हिंसेचा अन
खोटे नाणे वाजे खणखण
राज्य ठगांचे जागोजागी
सत्य कचरते, मरते कणकण
उठा उठा हो विघ्न विनाशक
पुरे बघणे हा तमाशा
भयकंपित तन, शंकातूर मन
दिसामाजी सुटते आशा
उठा उठा हो खल निर्दाया
उठा उठा हो रिपु हराया
उठा उठा हो तम वाराया
उठा उठा हो त्वरा करा
उठा उठा हो त्वरा करा
संकट नाशा शस्त्र धरा
धाव झडकरी तूच तारी
गणपती बाप्पा मोरया !
| |
|
|
No comments:
Post a Comment