मी सृजनाची शक्ती
निरामय भक्ती
तृप्त- अतृप्ताची वीण
मी चराचर सृष्टी
अदृष्ट दृष्टी
करुणेची खाण
मी प्राजक्त फूल
मनाला भूल
कळ जीवघेणी
मी नभी लुकलुकते
रात्र उजळते
चांदणी राणी
मी दामिनी रौद्र
वादळी रात्र
थरथराट गगनी
मी लाटांचा कल्लोळ
वणव्याचा लोळ
भयकंपित धरणी
मी असुरांची सूरा
देवांची अप्सरा
मोहमायाजाल
मी तृप्त भूमी दरवळ
प्रसवेची कळ
जीवनदान
पांडवांची आग मी
पांडवांची लाज मी
सूडाचा डोंब
रामाची प्रेमपरीक्षा
लक्ष्मणाची तपश्चर्या
रावणाचा क्षोभ
मी आत्मा निर्मितीचा
थाट कवितेचा
सूर-संगम
मी विश्वगर्भीचा ओंकार
अरूप साकार
मी ब्रह्म !
अमिता खरे
5/1/2019
No comments:
Post a Comment