चालता चालता एक दिवस
हात धरायचाच कंटाळा आला
वाट झाली अनोळखी
आणि आसमंत परका
हळूच डोकावून बघितलं
स्वत:मधेच, घाबरत
तेव्हा कुठे लक्षात आलं
की रस्ता माझा कधीच नव्हता
हातात हात घालून खरेतर
चालले होते फरफटत.
सूर मिसळला सुरात पण
गाणं माझं कधीच नव्हतं.
मीच माझ्यावर ओतला होता
खोट्या समजेचा लेप
आता खपल्या पडल्यावर कळतंय
की कातडीचा रंग बदललेला नाहीये
मला आवडते तुझी सोबत
अगदी मनापासून
पण म्हणून मी तू होउ शकत नाही
किंवा तू मी.
परत एकदा मला कोंब फूटू लागलेत
मनाचा कण कण
अस्वस्थ, उन्मादित, आतुर
ज्वालामुखीची वाट बघणार्या
लाव्हा सारखा
चल, परत एकदा गाउ गाणं
तू तुझं, मी माझं
मनमुराद देवू दाद
सुरातही मिळवू सूर,
जर गाणं भावलं तर
पण बंधन नको
गाण्याचं, तालाचं आणि आवडण्याचं.
No comments:
Post a Comment