निथळणाऱ्या मनाला
घट्ट पिळून, छान पुसून
तिने जागच्या जागी
ठेवून दिले,
हृदयावर पडलेले वेदनांचे चरे
अपमानाच्या सुरकुत्या,
इस्त्री करून ते पण
छान खोचून ठेवले.
अस्ताव्यस्त पसरलेले विचार
माळेमधे सलग ओवले
खोट्या मानापमानाच्या कल्पना
बासनात गुंडाळून ठेवल्या.
आत्मनिर्भर हास्याचे तोरण
चेहेऱ्यावर सजवून
नवीन वर्षाचे स्वागत
करायला ती सज्ज झाली.
अमिता खरे
५ जानेवारी २४
No comments:
Post a Comment