माझी मराठी गं बोली
काय सांगू मी कौतुके
तिच्या दिमाखापुढती
सूर्य चंद्र वाटे फिके
कणखर बाज हिचा
रांगडा हो साज
कधी अमृताचे घट
अनवट वीण खास
माझी मराठी गं बोली
ऊन सावलीचा खेळ
किती सुरेख घातला
काना मात्रांचा हा मेळ
तुका ज्ञानियाची वाणी
शिवरायांची ही माय
हिच्या गर्जनेने होई
फिरंग्याना हाय हाय
माझी मराठी गं बोली
दौड अटकेच्या पार
नाठाळाचे माथी हाणे
रामदासी प्रहार
माझी मराठी गं बोली
जसे बकुळीचे फूल
हिचा रानटी शृंगार
घाली पंडितांना भूल
२ फेब्रुवारी २४
No comments:
Post a Comment