तिने ठरवलं
आता मोकळं व्हायचं
अनेक दिवस ती न्याहाळत होती
अंगणातला मेपल
एकेका पानाचा लोभ सोडताना
अगदी तसेच
आत्ममग्न वैराग्य
सोडून द्यायचे इतके दिवस
(का वर्षे?) जोपासलेले, सांभाळलेले
हेवे-दावे, राग-रुसवे,
काळाच्या आघाताचे व्रण,
आठवणींच्या कुरवाळलेल्या जखमा.
मुक्त करायची
विचारांची वावटळ
कचाट्यात पकडून, गरागरा फिरवत
खोल खोल अंधाऱ्या गुहेत नेणारी
सोडून द्यायचे एकेक करत
स्वतःला लावून घेतलेले दोष,
दुसऱ्याला दिलेली दूषणे,
पुसून टाकायचंय अभागी मळवट
अगदी मोकळं मोकळं
हलकं हलकं वाटेल
मनावरच्या, खांद्यावरच्या ओझ्याशिवाय
अनोळखी होईन कदाचित
स्वतःलाच
मग परत एकदा
आतुरतेने वाट बघीन
नव्या,कोवळ्या, तरतरीत,
आश्वासक पालवीची.
Based on these images for the Monologue group
No comments:
Post a Comment