Post Language

Friday, September 20, 2024

बटाटे पुराण

 



आमच्या घरामागे एक छोटा बगीचा आहे. एक छोटासा गझीबो, त्यात बसायला खुर्ची आणि सोफा. आम्हाला दोघांना बागेची हौस आणि सोस. हौसेने लावलेली फुलझाडे, द्राक्षाचे वेल, थोडी फळझाडे (हा सोसाचा भाग). फुले, फळे अगदी सुंदर येतात. प्रत्येक ऋतूत  वेगवेगळी. पण भाज्यांची कथा जरा निराळी आहे. 

गेली अनेक वर्षे, हवेतला गारवा कमी झाला आणि जमीन थोडी उबदार झाली कि नर्सरीची फेरी करून तरतऱ्हेच्या भाज्यांची रोपे आणणे हा आमचा आवडता उद्योग. टोमॅटो, मिरच्या - तिखट आणि ढोबळी, काकडी, झुकिनी अशी अनेक रोपे आणून जमिनीमध्ये थोडी नवी माती, थोडे घरी केलेले कंपोस्ट, असे मिसळून जमीन तयार करावी. दरवर्षी ऊन कुठल्या भागात, कसे येते आहे याचा रिसर्च करावा. कारण मधल्या काळात कडेची झाडे उंच झालेली असतात. सावली पाडणाऱ्या झाडांची कापणी करावी. पाण्याची ठिबक सिंचन व्यवस्था नीट चालते आहे ना याची खात्री करावी आणि मोठ्या प्रेमाने भाज्यांच्या बिया आणि रोपांची लागवण करावी. या व्रतात खंड पडत नाही. 

पण एव्हढे सगळे करून हाती काय लागेल याची खात्री नाही. म्हणून या वर्षी ठरवले की भाज्यांच्या नादी लागायचे नाही. फक्त एक थाई मिरचीचे रोप आणि दोन झुकिनी लावले. नंतर कोणीतरी व्हॉट्सऍप  वर बटाटे लावणार असे जाहीर केले. म्हटले चला यावर्षी बटाट्याचा प्रयोग करू. मंगळावर जर मॅट डेमन ला बटाटे उगवता येतात तर आपल्याला पृथ्वीवर जमायला हरकत नाही. 


मग संशोधन चालू झाले गुगल वर. चांगले डोळे असलेल्या दोन बटाट्यांचे ४ भाग करून जमिनीत गाडले. दोन आठवड्यात गोंडस, छोटीशी पाने जमिनीतून डोके वर काढू लागली. तेव्हढे बघूनही खूप आनंद झाला. चला रुजले वाटते! एका महिन्याभरात मग हळू हळू रोप अजून मोठे झाले. मग रोपाला अजून फांद्या फुटून एक हातभर उंचीचे झाड झाले. माझी आशा पालवली. सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे बटाटे तयार झाले हे कसे कळणार? हल्ली सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहिती असणारा बिरबल एकच - गुगल भाऊ! त्याला विचारले तर म्हणे पानफुटी नंतर ९०- १२० दिवसात बटाटे हाती येतील. रोपांची पाने पिवळी पडून संकेत देतील. आता आली का पंचाईत! आंम्हाला बरेच प्रश्न पडले. सगळी पाने पिवळी पडे पर्यंत थांबायचे का? झाड पूर्ण मरून द्यायचे की नाही ? बरं, खणून बघता येणार नव्हते झाले का बटाटे तयार. हे जरा अवघडच वाटत होते. सफरचंद, द्राक्षे, काकडी, टोमॅटो जमिनीच्या वर असल्याने तयार झाले की नाही ते बघून, हात लावून समजते. कंदमुळे हे जरा वेगळेच प्रकरण आहे!

३ महिने गेले. आता थोडी पाने पिवळी पडायला लागली होती. दर दोन दिवसांनी आम्ही एकमेकांना विचारायचो कधी काढूया? आज? नको थांबू थोडे. दर दोन दिवसांनी किती पाने पिवळी पडली, झाड मरायला टेकले आहे का, बटाटे आले असतील का, असले तर किती अशा चर्चा चालू होत्या. आसपास ज्यांनी पूर्वी बटाटे लावले होते त्यांचा सल्ला घेतला. ते म्हणाले थोडे थांबा. 

मग लंबोदर गजाननाचे आगमन झाले. त्याच्या तयारीत, धामधुमीत बटाट्यांचा विसर पडला. आठ दहा दिवसांनी आठवण झाली तेव्हा रोपांची बहुतांशी पाने पिवळी पडून त्यांनी मान टाकली होती. मी खुरपे आणि एक प्लास्टिकचा फोर्क घेऊन अंगणात आले.  गुगल वर वाचले होते की खुरप्याने झाडाखालची जमीन खणली तर बटाटे तुटतात म्हणून उत्खनन शास्त्रज्ञासारखे हळू हळू फोर्कने खोदायचे. माझे खोदकाम चालू झाले. खरे तर मला फार आशा नव्हती. 

पण काय आश्चर्य, काळ्या मातीतून सोनसळी रंग डोकावू लागला आणि चक्क एक आख्खा बटाटा दिसला. मी त्याच्या कडेकडेने सावकाश खणू लागले. बघता बघता २-३ बटाटयांनी दर्शन दिले. मी अचंबित! चक्रीवादळात उडून गेलेल्या डोरोथीला “यल्लो ब्रीक रोड” दिसल्यावर झाला असेल तेव्हढाच आनंद आणि अप्रूप मला ते ओळीत आलेले सुंदर सोनसळी बटाटे बघून वाटले. मी या आनंदात असताना नवऱ्याला बटाटेवडे, भजी दिसायला लागली आणि त्याचे डोळे चमकू लागले. थोडक्यात काय दोघे अगदी खुशीत आलो. मग आठवण झाली, फोटो आणि विडिओ काढायचा राहिला. व्हॉट्सऍप वर टाकायला नको? सवयीचे गुलाम !! 

अशा तर्हेने दोन बटाट्यांचे १० बटाटे झाल्याचा चमत्कार याची डोळा बघितला आणि पुढच्या वसंतात बटाट्याची परत पेरणी करायची यावर शिक्कामोर्तब झाले. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. 😀


(शब्द: लंबोदर, खुर्ची, गुलाम, चक्रीवादळ, बगीचा ) 


1 comment:

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!