आज अजून एक वाढदिवस खिशात टाकून ती भटकायला बाहेर पडली. एकटीच. आज थोडा वेळ तरी मनाला वाटेल ते करायचे अशी तिने स्वतःला परवानगी दिली होती. “हे कसले नवीन फॅड ? आमच्या वेळी नव्हते असले काही !” आईचा आवाज कानात घुमला तसे तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पायात शूज घालून दुसरा काही विचार मनात डोकवायच्या आत तिने रस्ता धरला तिच्या आवडत्या जागेचा.
फॉल मधला सुंदर दिवस. रस्ताभर लाल,किरमिजी, पिवळ्या, तपकिरी पानांचे गालिचे अंथरले होते. ‘अगदी रेड कार्पेटच पसरले आहे जणू आपल्यासाठी’. उगाच खुद्कन हसू आले तिला. चालता चालता २-४ वेगवेगळी पाने तिने नेहेमीसारखी गोळा केली. फॉल मधे पाने, हायकिंग ला गेले की पाइन कोन आणि समुद्र किनारी शंख, शिंपले, वेगळा एखादा दगड असे काही गोळा करून घरी आणणे हा तिचा नेहेमीच उपक्रम.
हवा जराशी गारसर पण अजून बोचरेपणा चढायचा होता हवेला. निरभ्र निळे आभाळ, थोडा पश्चिमेकडे कललेला सूर्य; स्वतात च रमलेला.
तिने एक खोलवर श्वास घेतला.
पाय जसे भरभर हलू लागले तसे छान उबदार वाटू लागले. एक लय आली चालीला आणि मग मनही मोकळे व्हायला लागले.
आता सूर्य बराच खाली सरकला होता. मंद वारे वाहू लागले. तिने पायांची गती अजून थोडी वाढवली. सूर्यास्ताला तलाव गाठायलाच हवा होता. त्यासाठी तर सगळा अट्टाहास ! खरे तर कारनेच यायला हवे होते. घरातून निघता निघता नेहेमीच उशीर होतो. तिने आता चक्क जॉगिंगलाच सुरुवात केली. एकदा का सूर्य ढळायला लागला की इतका झपकन बुडतो. घाई करायला हवी.
समोर तलावाची निळाई दिसायला लागली. या तलावाने कायमच तिला भूल घातली आहे. गेल्या अनेक वर्षात लाखो वेळा आली असेल ती. पण दरवेळी वेगळा अनुभव, वेगळी भावना. फॉल मधले तळ्यावरचे सूर्यास्त तर शब्दात पकडण्याच्या पलीकडचे !
पश्चिमेकडे कुठूनसे थोडे ढग जमा झाले. म्हणजे आता सूर्यास्ताला फारच रंगत येणार. तिने धावत पळत तिचा नेहेमीचा बाक गाठला आणि पूर्ण ध्यान समोरच्या विलोभनीय दृश्यावर केंद्रित केले. केशरी, लाल सोनेरी रंगांचा ढगांमध्ये पदन्यास. चुळूक चुळूक करणाऱ्या लाटा, त्यावर तरंगणारी एकांडी बोट. जसजसा सूर्य खाली जाऊ लागला तसा तलावाचा रंग बदलू लागला. निळ्या रंगाच्या असंख्य छटा, त्यात सोनसळी प्रतिबिंबे. एकमेकांना साद देत परतणाऱ्या बगळ्यांच्या रांगा बरोबर वसंतरावांचे सूर घेऊन आल्या. सुरमयी पावलाने आलेली संध्याकाळ मनामध्ये रुमझुमत उतरत गेली. शब्द आणि स्पर्शाच्या पलीकडले काही मनात उमलू लागले. हातात न गवसणारे.
सगळे जग एका बिंदूत येऊन स्थिरावल्याचा भास झाला. मन शांत, स्थिर झाले.
आज सकाळपासून थोडी हुरहूर लागली होती. नाही म्हटले तरी वाढत्या वयाचे तरंग तना-मनावर उमटायला लागले होते आजकाल. मधून मधून शंकेची पाल चुकचुकायची - निसटून चालले आहे का आयुष्य?
पण आत्ता ते सगळे विरून गेले. जोपर्यंत सूर्यास्त गाठायची, ईंद्रधनुष्य शोधत जायची, लाटांमध्ये भिजायची आणि संगीतात बुडून जायची आस आहे, मनमोकळे खळाळते हसू आणि जीवलगांची साथ आहे तोपर्यंत वय कितीही वाढले तरी काय फरक पडतो. स्वतःला झोकून देऊन जगता आले पाहिजे. शिशिरामध्ये पानगळ होईल, हिवाळ्यामध्ये काड्या राहतील म्हणून वसंतात झाड फुलायचे थांबत नाही.
तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नाजूक चंद्रकोरीच्या दिमाखदार रुपाला मनापासून दाद दिली.
No comments:
Post a Comment