असं वाटलं की मनातलं जडपण कागदावर उतरवलं की हलकं वाटेल, पण शब्दच सुचत नाहीयेत.
असंही होऊ शकतं ? एखादा अनुभव इतका गहन की शब्द अपुरे पडतात आणि फक्त जाणीव उरते. जाणीव अधुरे असल्याची, नाशवंत तरीही सुंदर आयुष्याची. मृत्यू पलीकडे जाणाऱ्या प्रेमाची, नात्यांची. जाणीव ही की, किती अज्ञानी असतो आपण. स्वतःच्या आणि कुणाच्याच आयुष्यात काय लिहिले आहे ते सांगू शकत नाही, पण आव आणतो सगळे काबूत असल्याचा.
जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आणि कसा आपला अंत लिहिला आहे कोण जाणे . मग रोजची धडपड कशासाठी?
कशासाठी अट्टाहास आयुष्य बेतून आपल्याला फिट्ट बसेल असं बघण्याचा?
हतबल वाटते आहे असे नाही आणि सगळे सोडून संन्यास घ्यावा असंही वाटत नाही. पण असं जरुर वाटतं की छोट्या छोट्या अपेक्षांचे ओझे ओढत नाही फरफटले तरी चालेल. आला दिवस मनापासून आपले काम करावे, कुणाचे वाईट चिंतू नये, वाईट करू नये. माफ करावे आणि करून घ्यावे. आपण एकटेच जगात येतो आणि एकटेच मरतो. सभोवतालचा गोतावळा दिवस साजरा करायला, सोबती नाही कायमचा.
No comments:
Post a Comment