Post Language

Wednesday, October 17, 2018

आजीची साडी

परवा कपाट आवरताना आजीची नऊवारी साडी सापडली. मी चक्क स्तब्ध झाले क्षणभर. आजीची साडी! तिचा मऊ, मायाळू स्पर्श.
एकदम असे वाटले की अनेक वर्षांनी आजीने परत एकदा कुशीत घेतले आहे. मी पूर्ण विसरून गेले होते की ही साडी अजून माझ्याकडे
आहे. मोठा मुलगा तान्हा असताना मुद्दाम मी आजीची साडी घेऊन आले होते. उन्हाळ्यात त्याला पांघरायला होईल म्हणून. त्यामागे मुख्य
कारण हे असावं की मी स्वतः अनेक वर्ष आजीची साडी आवडीने पांघरत होते. एक तर ती पांढरी शुभ्र, सुती आणि तलम नऊवारी साडी
उन्हाळ्यात पांघरायला अतिशय योग्य होती आणि दुसरं म्हणजे त्या साडीवर एक अजून आवरण होतं ते आजीच्या मायेचं
साडी हातात घेऊन मी विचार करू लागले-- साडी ठेवावी की टाकावी? आता ती साडी कोणीच पांघरत नाही, पुढेही वापरण्याची  शक्यता
नाही. माझ्या व्यवहारी मनाने आजीची साडी बाजूला ठेवली- टाकून देण्यासाठी. बाकीचं सगळं कपाट आवरून झालं आणि टाकायचा
सगळा गठ्ठा घेऊन मी खाली आले. पण मला काही ती साडी टाकवेना. राहू दे, नंतर बघू असं म्हणून मी आजीची साडी दुसऱ्या एका
कपाटात ठेवून दिली आणि मग मी विचार करायला लागले की एवढं त्या जुन्यापुराण्या साडीत आहे काय? का ती मला टाकवत नाहीये?
मग लक्षात आलं की तो नुसता नऊवारी कपडा नाही आहे तर त्या नऊवाराच्या प्रत्येक वारामधे आजीच्या अनेक आठवणी सामावलेल्या
आहेत.


दर उन्हाळ्याच्या सुट्टीमधे आम्ही आजीकडे रहायला जायचो. आजीचं घर दोन खोल्यांचं. एक खोली वर, एक खाली आणि मोठ्ठं अंगण.
खेळायला मुलं भरपूर कारण आजीचं पाळणाघर होतं. आजीचा दिवस पहाटे साडेचारला सुरु व्हायचा. पाणी आलं की मग तिची स्वत:ची
आंघोळ, धुणे, पाणी भरणे वगैरे कामं होईपर्यंत एकेक मुले यायला लागायची. आजी सगळ्यांचं इतक्या प्रेमाने करायची की येणारी सर्व
मुले तिची नातवंडच झाली होती. मग मुलांच्या खाण्याची विचारपूस, कोणाचा डबा कमी आलेला असायचा, कुणी विसरलेला असायचा.
पण हे त्यांचं पाळणाघर नसून दुसरं घरच असल्याने मुलांनाही चिंता नसायची आणि पालकांनाही. सुट्टीत अभ्यास नसायचा पण शाळा
चालू असताना आजी राहिलेला गृहपाठ पण करून घ्यायची. मुलं जमली की आम्ही खूश! मग दिवसभर नुसता दंगा. विटी-दांडू, लगोर,
डबडा ऐसपैस. मस्त धमाल. दुपारी दारावर आईस्किमच्या गोळ्याची गाडी यायची मग कधी गोळा खायचा, तर कधी कोपऱ्यावरच्या
दुकानातून पॉपसिकल आणायचं.( ‘कुठंलं पाणी वापरतात बर्फ करायला?’ असा प्रश्न तेव्हा पडायचा नाही ते बरं होतं) मग फार ऊन
झालं की आजी घरात यायला लावायची. वाळ्याचा पडदा पाण्यात भिजवून दाराला लावायची. त्याच्यावरून वारं आलं की छान गार
वाटायचं. ’Green’ air conditioning! अशा वेळी रंगायचा पत्त्याचा डाव. मग जरा उन उतरलं की परत हुंदडणं सुरु. दिवस कसा
जायचा ते कळायचं नाही. संध्याकाळी पाळणाघरातली मुलं घरी गेली की जरा शांतता. उगाच कोपऱ्यावर चक्कर मारायला जायचं.
परत येऊन शुभंकरोती, पाढे म्हणून जेवण करून दिंडी-दरवाजात बसायचं. रात्री जेवताना आजीने कालवलेल्या दूध-दही भातापुढे
चितळेची मावा बर्फी झक मारेल! मग गल्लीत जाणाऱ्या - येणाऱ्याशी गप्पा, रेडिओ ऐकणे असा टाईमपास करून अंगणात पथारी
पसरायची. तेव्हा पुण्याची हवा हेवा करण्याजोगी असल्याने,रात्री गार हवेच्या झुळकांमधे मस्त झोप लागायची आणि पांघरायला
अर्थातच आजीची साडी! साधे-सोपे दिवस आणि साधं निर्भेळ सुख. समाधानी बाळपणासाठी अजून काय पाहिजे?

म्हणूनच अजूनही आजीची नऊवारी कपाटात जपून ठेवली आहे.

No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!