हे कधी झालं?? ख्रिसमस हा आपला सण कधीपासून झाला?? कदाचित माझ्या लक्षात आत्ता आलं असेल. Thanks to facebook! आज एका दिवसात अचानक facebook वर धडाधड "merry Christmas" चे संदेश यायला लागले. बर्याच जणांनी घरातल्या ख्रिसमस ट्री चे फोटो, सगळ्या कुटंबाचे फोटो पण पोस्ट केले. मी म्ह्टलं, अरेच्या ख्रिसमस एक हिंदू सण कधी झाला की सर्वांनी एकमेकांना ख्रिसमस च्या शुभेच्छा द्यायला हव्यात?
अमेरिकेत रहायला येऊन आम्हाला आता १८ वर्ष झाली. ऎवढ्या वर्षात माझ्यात बरेच बदल झाले आहेत. तसेच अमेरिकेत पण आणि जगात पण झाले आहेत. इथे रहायला आल्यावर सुध्दा आमच्या घरी आम्ही ख्रिसमस ट्री आणू असं मला कधी वाटलं नव्हतं. नंतर मुलं जशी मोठी झाली तसं शाळेतल्या सगळ्या मुलांकडे ख्रिसमस ट्री आहे मग आपल्याकडे का नाही असे प्रश्न सुरु झाले. त्यामुळे मग मुलांना अगदीच वेगळं वाटू नये म्हणून पहिल्यांदा छोटं १ फुटी ख्रिसमस ट्री आणलं. मग मुलं मोठी होत गेली तसा त्याचा आकार वाढत ६ फुटापर्यंत गेला. मुलांना ख्रिसमस ट्रीचं आर्कषण त्याच्याखाली असणार्या गिफ्ट्स मुळेच होतं. सुरुवातीची काही वर्ष उत्साहाने ख्रिसमस ट्री लावणे, सजवणे वगैरे प्रकार झाले. आता गेले २ वर्ष मी त्यांना म्हटलं की मला वेळ नाही, तुम्हाला हवे तर तुम्ही ख्रिसमस ट्री लावा, तुम्ही सजवा आणि नंतर आवरून पण ठेवा. ख्रिसमस ट्री असलं काय नी नसलं काय, मला फरक पडत नाही. तेव्हा मुलं म्हणाली की एवढं काम कोण करणार? त्यामुळे मागची २ वर्ष आमच्याकडे ख्रिसमस ट्री नव्ह्तं. या वर्षी परत एकदा निहारला उत्साह आला आणि त्यानेच पुढाकार घेऊन ख्रिसमस ट्री खोक्यातून काढलं, सजवलं. अर्थात हे सगळं गिफ्ट मिळवण्यासाठीच. अमेरिकेत सगळीकडे बर्याच प्रमाणात हाच प्रकार आहे. ख्रिसमस हा मुख्यतः व्यावसायिक सणच झाला आहे. सगळ्यात जास्त चर्चा 'hottest gift of the year' चीच असते. सर्वाचं लक्ष लोकं खरेदी किती करतात, मग त्याचा economyवर किती परिणाम होईल या गोष्टींवरच असतं. पण तरीसुध्दा ख्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सगळ्यात मोठा धार्मिक सण आहे. आपला त्याच्याशी काय संबंध?
मी स्वतः फार धार्मिक वृत्तीची नाही. कट्टर हिंदुत्ववादी तर अजिबातच नाही. मला माझ्या हिंदुत्वाचा अभिमान आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाने स्वतःला भावेल तसा स्वतःचा धर्म पाळावा. त्याचबरोबर दुसर्याच्या धर्मात ढवळाढवळ करू नये, आपला धर्म दुसर्यावर लादू नये. धार्मिक सहिष्णुता (secularism) म्हणजे सर्व धर्म समान मानून सर्वांबद्दल सारखाच आदर बाळगणे. सर्व सनातन धर्मांच्या मुळाशी गेलं तर सगळे धर्म एकच सांगतात - माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं. प्रत्येक देशामधे जो धर्म पाळणारे सर्वाधिक लोक असतील त्या धर्माचे सणवार तेथे साजरे होणार हे स्वाभाविक आहे. अमेरिकेत ख्रिश्चन लोक जास्त रहात असल्याने ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा होणारच. मग ख्रिसमसचं डेकोरेशन सार्वजनिक ठिकाणी केल्याने बाकी धर्मांच्या भावना दुखावण्याचं काहीच कारण नाही. आपण जर ख्रिश्चन देशात रहातो तर हे होणारच. पण म्हणून मी स्वतः ख्रिश्चन लोकांसारखं वागायाचं काहीच कारण नाही. मी माझा धर्म सांभाळीन, ते त्यांचा. हिंदू लोकांनी एकमेकांना ’merry Christmas' म्हणायची गरज काय आहे? ख्रिश्चन लोक एकमेकांना ’happy Hanukkah' म्हणताना कधी ऐकलंय? तुमचे जे ख्रिश्चन मित्र असतील त्यांना लक्षात ठेऊन, आर्वजून ’merry Christmas' म्हणा. पण या बाबतीत सब घोडे बारा टक्के कशाला? मला बर्याच वेळा अमेरिकन लोक विचारतात," do you celebrate Christmas?" माझं उत्तर," No, but we do have the tree sometimes". त्यांना याचं पण आश्चर्य वाटतं. ख्रिश्चन नसताना ख्रिसमस ट्री? एवढा मनाचा मोठेपणा फक्त आपण हिंदूच दाखवू शकतो. अगदी कट्टर हिंदुत्ववादी सोडले तर बाकी सर्वसामान्य हिंदू माणूस ’आम्ही छान, तुम्ही छान’ या तत्वाने जगतो.
’विश्वची माझे घर’ ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे. आता जगाच्या पाठीवर कुठेही रहाताना वेगवेगळे लोक, त्यांचे धर्म, त्यांच्या चालीरीती याबद्दल जागरूक राहून त्यानुसार tolerance दाखवणे हेच उचित आहे. स्वतःच्या धर्माबद्द्ल अभिमान आणि दुसर्याच्या धर्माबद्द्ल आदर बाळगावा. आता आपण सगळे अमेरिकेत रहातो म्हणून घरी ख्रिसमस ट्री लावतो. माझ्यापुरती तरी तीच माझी मर्यादा आहे. ’Merry Christmas' हे जरा जास्तच ताणल्यासारखं वाटतं.
No comments:
Post a Comment