कितीतरी वेळा तुला
रिझवले, खुलवले, फुलवले
कितीतरी वेळा तुला
सतावले, खुळावले, भंडावले
शब्दांची भुरळ घालून
भुलवले, मोहवले,
ऊरफाट्या वाटेवरती
रागावले, समजावले, वळवले
दाटून येता मळभ
सुस्कारले, उसासले, रडले
आनंदगंध तरंगी
सुखावले, हरपले, भिजले
भरती ओहोटीत तुझ्या
शहारले, सुकले, आसुसले
उधाण वादळी
हेलपाटले, भांबावले
घालून गळ्यात गळा
गुणगुणले, रुणझुणले
स्वप्नरंजनात
रमले, भुलले, हरखले
तुझ्या रंगात रंग
तुझ्या सोबतीचा संग
तू माझा आरसा
मी तुझे प्रतिबिंब
No comments:
Post a Comment